पिंपरी – आपल्या कामाचे पैसे मिळावेत, यासाठी ठेकेदाराने बिल्डरच्या कार्यालयासमोर दोन दिवस ठिय्या मांडला. मात्र त्यानंतरही पैसे न मिळाल्याने विषारी औषध पिऊन ठेकेदाराने आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार चिंचवड स्टेशन येथे बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी बिल्डरांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश जगदीशप्रकाश अगरवाल, संतोष रामअवतार अगरवाल, राहूल भंडारी, अजित सुभाष गायकवाड, अभिजित गायकवाड, सचिन किल्लेदार, ललित जैन आणि इतर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्रविण पंडीत पाटील असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत त्यांचा मेहूणा विनोद भाऊराव पाटील (वय 48, रा. जळगाव) यांनी बुधवारी (दि. 25) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मयत प्रवीण पाटील यांनी आरोपी बिल्डरांकडून ठेकेदारी पद्धतीने काम घेतले होते. त्यापोटी आरोपींकडून प्रविण यांचे 1 कोटी 94 लाख रुपये येणे बाकी होते. आरोपी बिल्डरांनी काम झाल्यावरही प्रवीण यांच्या कामाचे पैसे दिले नाहीत. आपल्या कामाचे पैसे मिळावेत यासाठी प्रविण हे सातत्याने आगरवाल यांच्याकडे पाठपुरावा करत होते.
मात्र आगरवाल व त्यांच्या सहकाऱ्यांकडून पैसे देण्यास टाळाटाळ सुरू असल्याने प्रवीण यांनी चिंचवड स्टेशन येथील अगरवाल यांच्या कार्यालयासमोर मंगळवारपासून (दि. 24) ठिय्या मांडला. दिवसभर थांबूनही त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे बुधवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास प्रविण यांनी विषारी औषध प्राषण केले. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीण यांनी वरील सात आरोपी व इतरांच्या विरोधात चिठ्ठी लिहिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि फसवणूक करणे या कलमांखाली आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.