पुणे – महानगरांचा विस्तार झाल्यानंतर प्रामुख्याने वाहनांची संख्या आणि वापर वाढल्याने हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. अधिक वेळ प्रदूषित हवेशी संपर्क आल्यास आरोग्यावर थेट परिणाम होतो. मात्र, याबाबत नागरिकांमध्ये अनभिज्ञता असते. वाहतूक नियमन करणारे वाहतूक पोलिसांपैकी बहुतांश जण 6 तासांहून अधिक काळ प्रदूषित हवेच्या सान्निध्यात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये फुफ्फुस आणि श्वसनाचे आजार वाढत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
हवा प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये कमी जागरुकता आहे. हवेच्या गुणवत्तेबाबत नागरिकांचे समज जाणून घेण्यासाठी “परिसर’ संस्थेने प्रदूषित हवेशी संपर्क असणाऱ्या नागरिकांमध्ये सर्वेक्षण केले. यामध्ये वाहतूक पोलिसांचादेखील समावेश आहे. यात चतु:शृंगी, कोथरूड, डेक्कन आणि खडकी या वाहतूक विभागांतील 100 कर्मचारी सहभागी झाले होते. या सर्वेक्षणानुसार, 2 तासांपर्यंत 3 जण, 2 ते 4 तास 3 जण, 4 ते 6 तास 1 जण आणि 6 तासांपेक्षा जास्त 93 जण प्रदूषित हवेच्या सान्निध्यात असतात. वाहतूक पोलिसांचा दीर्घकाळ प्रदूषित हवेशी संपर्क येत असल्याने त्यांच्यात फुफ्फुसांच्या आणि श्वसनाच्या आजारांचे प्रमाण जास्त असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.
“हवा प्रदूषण’ ही संज्ञा माहिती असल्याचे 99 जणांनी सांगितले. 62 जणांनी सूक्ष्म धूलिकण (पार्टीक्युलेट मॅटर-पीएम) विषयी ऐकले होते. अतिसूक्ष्म धूलिकण आणि हवेच्या गुणवत्तेचा
निर्देशांकाबाबत (एअर क्वालिटी इंडेक्स-एक्यूआय) निम्म्याहून अधिक लोकांना माहिती नव्हते. यासह 80 टक्के जण हवेची गुणवत्ता तपासत नाहीत.
संपूर्ण मानवी शरीराची हानी…
शरीरातील प्रत्येक अवयव, पेशीला वायूप्रदूषणाचा धोका संभावतो. वायू प्रदूषणामुळे माणसाच्या डोक्यापासून पायापर्यंत सर्व अवयवांची हानी होऊ शकते. हृदयापासून ते फुफ्फुसांच्या आजारापर्यंत आणि मधुमेहापासून ते मनोभ्रमापर्यंत आजार होऊ शकतात, असा वायूप्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
वाहनांचा कमी वापर आवश्यक
नागरिकांनी प्रवासामध्ये बदल करायला हवा. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम, विश्वसनीय आणि आरामदायी असल्यास आपल्या खासगी वाहनांपेक्षा ते सार्वजनिक वाहनांचा वापर करतील. त्यामुळे वाहन उत्सर्जन कमी होईल. वाहतूक व्यवस्थापन सुरळीत असल्यास कमी अंतरासाठी पायी चालणे, सायकल वापरणे हे पर्याय शक्य होतील, असे प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजनांविषयी वाहतूक पोलिसांनी अहवालात नमूद केले आहे.