मूर्तीदानाचीही सोय : केदारेश्वर येथील घाटावर विसर्जनाची चोख व्यवस्था
राजगुरूनगर – राजगुरूनगरनगर परिषद हद्दीत सात ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. ज्यांना मूर्ती दान करायच्या आहेत, त्यासाठी स्वतंत्र ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर केदारेश्वर येथील प्रमुख घाटावर सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली.
प्रकाश पाटील म्हणाले की, गणेश विसर्जन तयारीच्या अनुषंगाने केदारेश्वर येथे प्रमुख विसर्जन भीमा नदी घाटावरती सार्वजनिक स्वच्छते बरोबरच जीवरक्षकांच्या नेमणुका, अग्निशमन यंत्रणा, विद्युत व्यवस्था निर्माल्य कलश, ठेवण्यात आले. ठिकठिकाणी नगरपरिषदेचे कर्मचारी व पोलीस यांचा बंदोबस्त असणार आहे.
विसर्जन घाटावर मुख्य रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. भक्तांनी आपली वाहने तेथेच पार्किंग करावी. कचरा उचलण्यासाठी घंटागाडी विसर्जन घाटांवर औषध फवारणी, सुरक्षा, ध्वनिक्षेपक यंत्रणा, अत्यावश्यक सेवांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
- राजगुरूनगर शहरात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कुठलीही मिरवणूक काढू नये. शहरातील नागरिकांनी घराच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी सर्व कुटुंबासोबत येऊ नये. तसेच गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे