पुणे – बांधकाम व्यवसाय, विद्यार्थी वसतिगृहे, औद्योगिक संकुलांची निर्मिती व बांधकाम तंत्रज्ञान आदी व्यवसायांमध्ये नावलौकिक असलेला पुण्यातील कोहिनूर समूह यावर्षी बांधकाम क्षेत्रातील आपली 37 वर्षे पूर्ण करीत आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे औचित्य साधत, पुढील सहा महिन्यांत समूहाच्या वतीने तब्बल 20 लाख स्क्वेअर फूट इतके बांधकाम असणारे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
कोहिनूर समूहाचे सह-व्यवस्थापकीय संचालक विनीत गोयल म्हणाले, 37 वर्षांच्या कोहिनूर समूहाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच घर खरेदी करणारे ग्राहक, त्यांच्या गरजा आणि त्यांचे बजेट याचा आम्ही प्राधान्याने विचार करीत आलो आहोत. या नंतरही ही परंपरा पुढे चालू राहील. घर खरेदीदारांच्या गरजेप्रमाणे योग्य दरात घरे उपलब्ध करून देणे, प्रकल्पांचे वेळेवर हस्तांतरण करणे आणि उच्च दर्जाची विक्री पश्चात सेवा यामुळे आजवर नेहमीच आम्ही ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलो आहोत. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून 1800 कोटी रुपये मूल्य असलेले प्रकल्प सुरू करीत आहोत.
पुढील सहा महिन्यांत एकूण 20 लाख स्क्वेअर फूट इतक्या जागेत 4 नवे निवासी व 3 नवे व्यावसायिक प्रकल्प सुरू करीत आहोत. यापैकी 10 लाख स्क्वेअर फूट जागेवर निवासी प्रकल्प तर 12 लाख स्क्वेअर फूट इतक्या जागेवर व्यावसायिक प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. कोहिनूर समूहाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात ताथवडे, हिंजवडी फेज 1, सुस आणि बी. टी. कवडे रस्ता या भागात समूहाचे आगामी निवासी प्रकल्प सुरू होणार आहेत.
1 नोव्हेंबर 1983 साली स्थापन झालेल्या पुण्यातील कोहिनूर समूहाने आजवर 85 लाख स्क्वेअर फूट इतक्या निवासी जागेचे बांधकाम पूर्ण केले असून त्यांनी आजवर 6000 हून अधिक कुटुंबांसाठी गृहनिर्माण केले आहे. याशिवाय समूहाने 20 लाख स्क्वेअर फूट इतक्या जागेत 16 व्यावसायिक प्रकल्पांची उभारणी केली आहे.