पुणे –दिवाळीमध्ये व्यवसायात पुन्हा वृद्धी होऊन पूर्ववत होईल, अशी अपेक्षा आहे. नवरात्री ते दसरा या उत्सवकाळात पूर्वीसारखीच ग्राहकसंख्या बघायला मिळाली, बाजारपेठ पूर्ववत होण्याचे हे संकेत असून दिवाळीमुळेही ग्राहकात खरेदीचा उत्साह आहे, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.
शहरी भागापेक्षा भारतातील ग्रामीण भागातील आणि कृषी व्यवसायाशी निगडित ग्राहकांमध्ये खरेदी करण्याची जास्त क्षमता दिसून येत आहे. उत्सवकाळात अजूनही सोने खरेदीला सर्वाधिक पसंती आहे. तरुण मंडळी आणि पहिल्यांदाच गुंतवणूक करत असलेल्या ग्राहकांसह अनेक ग्राहकही गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याला पसंती देत आहेत. कमी वजनाच्या दागिन्यांसाठी चांगले बुकिंग्ज बघायला मिळत असूनही उत्पादने दिवाळी व धनत्रयोदशीच्या दिवशी ग्राहक घ्यायला येतील.
अमेरिकेतील निवडणुकीतील स्पष्ट निकालामुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतींमध्ये स्थिरता येईल. अमेरिकेमधील स्थिर सरकार हे स्टिम्युलसची घोषणा करणे अपेक्षित आहे. अशा कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन हे सोन्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करेल. अल्पावधी दृष्टीकोन पाहता सोन्यात तेजी दिसून येईल.
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सुट्या लॉंग वीकेंडसह 4 दिवसांच्या कालावधीत येत आहेत. त्यामुळे आम्हाला या 4 दिवसांत आमच्या सर्व स्टोअर्समध्ये ग्राहक मोठ्या संख्येने येतील, अशी अपेक्षा आहे.
गेल्या दिवाळीच्या तुलनेत जवळपास 85 टक्के व्यवसायाचे प्रमाण राहील आणि गेल्या 12 महिन्यांत सोन्याचे दर बऱ्याच प्रमाणात वाढल्यामुळे व्यवसायाचे मूल्य हे गेल्या वर्षीपेक्षा जास्त असेल, अशी अपेक्षा आहे.