छत्रपती संभाजीनगर – रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी शहरात मोठा राडा झाला होता. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील तीनही पक्षाची ‘वज्रमुठ’ सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे या सभेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. संध्याकाळी 5 वाजता या सभेला सुरूवात होणार आहे. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सभेत महाविकास आघाडीकडून संविधानाचे पूजन केले जाणार आहे.
राज्य आणि केंद्र सरकार संविधानाचे पालन न करता विरोधकांना हुकुमशाही पद्धतीने संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे संविधान पूजन केले जाणार आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाची निवडणूक आयोगाने भाजपच्या दबावाखाली येऊन पक्षाची नोंदणी रद्द करून चिन्ह काढून घेतले आहे.”
पुढे दानवे यांनी राहुल गांधी यांची खसदारकी रद्द केल्यावरुनही सरकारवर टीका केली आहे. “चोर म्हटले म्हणून राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आणि 24 राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. हे सर्व प्रकार घटनेची पायमल्ली करणारे आहे. विरोधकांना चिरडण्यासाठी कायद्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे आम्ही संविधानाचं पूजन करणार आहोत.”
मात्र यावर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी टीका केली आहे. “आमचं सरकार घटनेनुसार चालणार आहे. पण यांना हे सरकार नैतिक नसल्याचं वाटत आहे. संविधान पूजन करत आहे ही बाबा चांगली आहे, पण आधी घटनेचे पालन करा. निवडणूक आयोगाने पैसे घेतले असे म्हणणे योग्य नाही. फक्त संविधानाचा दिखावा करू नका,” असे प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिले.