नगर -नेवासे येथील एका करोनाबाधित रुग्णाचा 21 दिवसांनंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर जामखेड येथील चार, तर संगमनेर येथील तीन करोनाबाधित व्यक्तींचा 14 दिवसांनंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज या व्यक्तींचा दुसरा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या 23 अहवालांपैकी 20 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज पुन्हा 13 व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
नेवासे येथील एका करोनाबाधित रुग्णाचा 14 दिवसांनंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह, तर दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सात दिवसांनी पुन्हा त्याचा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता आज त्याचा दुसरा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, तो निगेटिव्ह आल्यास त्याला डिस्चार्ज दिला जाणार आहे.
तसेच संगमनेर येथील तीन आणि जामखेड येथील चार जणांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांचे घशातील स्त्राव पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत एक हजार 628 व्यक्तींच्या स्त्रावाची तपासणी केली असून, त्यापैकी एक हजार 535 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 44 असून, त्यापैकी 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. सध्या एकूण 17 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.