पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – निसर्गसाखळीत समतोल राखणात लांडगा या प्राण्याची महत्त्वाची भूमिका आहे. या प्राण्याच्या संरक्षण आणि त्यांच्या निरीक्षणासाठी आता कॅमेरा वॉच ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात लांडग्यांचे वास्तव्य कमी होत आहे. त्यामुळे लांडग्यांना आता दुर्मिळ प्राण्यांच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील लांडग्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी पुणे वनविभाग दी ग्रासलँड ट्रस्टच्या मदतीने ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावत आहे. या निरीक्षणामुळे विभागाला लांडग्यांचे वर्तन, त्यांची जीवनशैली तसेच शिकारीच्या प्रजाती समजण्यास मदत होईल. तसेच लांडगे आणि तरस या गवताळ प्रदेशातील प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी व्यवस्थापन योजना तयार करण्यात मदत होईल, असे पुणे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे वनविभागाच्या वर्षभराच्या आकडेवारीनुसार, पुणे शहराच्या आसपास ४५ हून अधिक लांडगे वास्तव्यास आहेत. राखाडी लांडग्यांच्या उपप्रजाती म्हणून या लांडग्यांना १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार शेड्यूल-१ (सर्वांत संरक्षित) प्रजाती म्हणून वर्गीकृत केले आहे. जगातील इतर सर्व लांडग्यांच्या प्रजातींपेक्षा दहा लाख वर्षांहून अधिक जुने म्हणून ओळखले जाणारे भारतीय ग्रे लांडगे उत्क्रांतीच्या इतिहासात एक अद्वितीय स्थान आहे. त्यामुळे वनविभाग द ग्रासलँड ट्रस्टच्या मदतीने दीर्घकालीन प्रकल्प राबवत आहे.
लांडग्यांची जीवनशैली समजून घेण्यासाठी त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रभावी व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात मदत होईल. या कॅमेरा ट्रॅपमध्ये आम्ही निगराणी करणार आहोत. ज्या भागात आम्ही लांडग्यांच्या हालचाली ओळखल्या आहेत, अशा अनेक ठिकाणी पीटीझेड कॅमेरे बसवत आहोत. – तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक, वन्यजीव, पुणे
मानवी अधिवासाच्या विस्तारामुळे, वन्यजीव अधिवास वाढत्या प्रमाणात खंडित होत आहेत. माणसांचा आणि त्या अनुषंगाने येणार्या अनेक गोष्टींचा वावर वाढल्याने या प्राण्यांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच कुत्रा आणि लांडग्यांमध्ये संकरीकरण निर्माण झाल्यामुळेही लांडग्यांच्या प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असले तरी, विशेषतः ग्रामीण भागात, व्यावहारिकदृष्ट्या ते कठीण आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या आसपास लांडग्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे हाच पर्याय शिल्लक आहे. – नेहा पंचमिया, वन्यजीव संरक्षक