म्हसवड – राज्यातील सरकार हे फसवणूक सरकार असून या सरकारचा निकाल हा घटनात्मक तरतुदीनुसार शेड्युल 10 प्रमाणे लागल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारही अपात्र ठरतील, असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी व्यक्त केला. कर्नाटकामध्ये कॉंग्रेसच सत्तेवर येईल, असेही त्यांनी सांगितले. म्हसवड येथील कॉंग्रेस कार्यकर्ते विकास गोंजारी यांच्या निवासस्थानी आ. पटोले यांनी धावती भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माण तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, प्रा. विश्वंभर बाबर, डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील, अल्पसंख्याक सेलचे गब्बार काझी, शांताराम माने, दाऊद मुल्ला, निलेश काटे आदी प्रमुख उपस्थित होते.
आ. पटोले म्हणाले, “”राज्यात कॉंग्रेसला चांगले दिवस येऊ लागले आहेत. माण तालुक्यात मी एका महिन्यात दुसऱ्यांदा येत आहे. दुष्काळी म्हणून ओळखला जात असला तरी याच तालुक्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भरघोस निधी देऊन सिंचन योजना मार्गी लावल्या आहेत. या तालुक्याने नेहमीच कॉंग्रेसची पाठराखण केली आहे. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधी सध्या कोणत्या पक्षात आहेत याचे सामान्य जनतेला काहीही देणंघेणं नाही. ती कालही कॉंग्रेससोबत होती, आजही आहे अन् उद्याही राहिल.”आगामी विधानसभा निवडणुकीत माण-खटावमध्ये कॉंग्रेसचा आमदार निवडून येईल, असे त्यांनी सांगितले.
सामान्य कार्यकर्त्यांला ताकद देणार
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांचे जंगी स्वागत कॉंग्रेस कार्यकर्ते विकास गोंजारी यांनी केले. यावेळी सामान्य कार्यकर्त्याच्या घरी पटोले आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सर्वसामान्य कार्यकर्ता हीच कॉंग्रेस पक्षाची खरी ताकद आहे, त्यामुळे यापुढे आपण माण- खटावमधील सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणार असल्याचे आ. पटोले यांनी स्पष्ट केले.