Karnataka: महाराष्ट्रातील मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर भारत जोडो न्याय यात्रेपूर्वी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे कारण आता काही महिन्यांनंतर लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरांसारख्या बड्या नेत्याचा पक्ष सोडल्यास काँग्रेसचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकीकडे हे चित्र असतानाच आता कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दिल्लीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत शेट्टर यांनी भाजपचे सदस्यत्व घेतले. यावेळी शेट्टर यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री व्हीएस येडियुरप्पाही पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले होते. त्यांच्यासोबत कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्रही दिल्लीत पोहोचले. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
#WATCH | Former Karnataka CM Jagadish Shettar re-joins BJP in the presence of former CM-senior party leader BS Yediyurappa and state BJP President BY Vijayendra, at BJP Headquarters in Delhi.
He had quit BJP and joined Congress in April last year. pic.twitter.com/sVJpP9AVu2
— ANI (@ANI) January 25, 2024
शेट्टर भाजपमधून का बाहेर पडले होते?
एप्रिल 2023 मध्ये कर्नाटक विधानसभेच्या आधी शेट्टर यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपने तिकीट नाकारल्याने ते संतापले होते. 10 मे 2023 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने शेट्टर यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा जाहीर केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली.
त्यांनी हुबळी धारवाड सेंट्रल मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचे महेश तेंगीनाकाई यांनी शेट्टर यांचा ३४,२८९ मतांनी पराभव केला. शेट्टर यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी उत्तर कर्नाटक भागात त्यांची चांगली पकड आहे. लिंगायत समाजाच्या मोठ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते
माजी मुख्यमंत्री असलेले शेट्टर हुबळी- धारवाड भागातून सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांचे वडिलही कर्नाटकच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ होते. शेट्टर यांचे वडील शिवप्पा शेट्टर हे हुबळीचे महापौर होते. तसेच दक्षिणेकडील राज्यात जनसंघाचे ते पहिले महापौर ठरले होते.