सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत खाते उघडण्यात अपयश
नवी दिल्ली : सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दिल्लीत खाते उघडण्यात अपयश आले. मात्र, त्यामुळे खचून न जाता कॉंग्रेसने पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
दिल्लीतील जनादेश आमच्या विरोधात गेला. तो जनादेश आम्ही स्वीकारतो. आमच्या मतांमधील घसरण चिंतेचा विषय आहे. मात्र, आम्ही पक्षाची फेरबांधणी करू. पक्षाला तळागाळात पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. नवे नेतृत्व पुढे आणले जाईल, असे कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी निकालानंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले.
दिल्लीत कॉंग्रेसला मजबूत बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पक्षाच्या प्रचार समितीचे अध्यक्ष किर्ती आझाद यांनी दिली. आम्हाला निवडणुकीत मोठा हादरा बसला. तो पराभव आम्ही नम्रतेने स्वीकारतो. मात्र, कठोर मेहनत घेऊन कॉंग्रेस कम बॅक करेल, असा विश्वास पक्षाचे दिल्ली प्रभारी पी.सी.चाको यांनी व्यक्त केला. दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली. दिल्ली कॉंग्रेसचा लढा चालूच राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.