मुंबई – ड्रग्ज व्यवसायात (Drug) कोणत्याही नेत्याचा संबंध असो, त्याला ठेचून काढलेच पाहीजे. जे आमदार-खासदार होतील त्यांच्या कुटुंबात अमली पदार्थांचे लायसन्स असता कामा नये. कॉंग्रेसच्या (Congress) नेत्यांची मी यादी देऊ शकतो ज्यांच्याकडे असे लायसन्स आहेत, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी रविवारी केले.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेबाबात मुनगंटीवार यांनी विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, एखाद्या नेत्याने मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा व्यक्त करण्यात गैर काहीच नाही.अपात्रतेच्या सुनावणीत काही अघटीत घडायचंच असेल तरी त्याचा मुख्यमंत्रीपदाशी काहीच संबंध नाही. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेच आहे की, विधानपरिषदेचा मार्ग मोकळा आहे. एकनाथ शिंदेंच्याच (Eknath Shinde) माध्यमातून 2024च्या निवडणूका लढवणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.मंत्रीमंडळाचा विस्तार चाय पे चर्चा करुन होत नाही. अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवश्यक असेल तिथे देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची मदत घेऊन मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे मुनंगंटीवार म्हणाले.
राज्यातील सत्ता संघर्षाबाबत ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अमुक एका बाजुने निर्णय द्या, असे सांगितले नाही. निर्णय वेगाने व्हावा ही सर्वसामान्यांची भावना असू शकते. जो हारणारा असतो तो निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यावर पैसे वाटण्याचा आरोप करतोच. भाजपचा कोणी कार्यकर्ता काटेवाडीत प्रतिस्पर्ध्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप करत असतील तर तो हारणारा असेल. आम्ही जर प्रतिस्पर्ध्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप करत असु तर पराभवाच्या मानसिकतेत जात असू असे मुनगंटीवार म्हणाले.
भारत-पाक सीमेवर आज महाराज विराजणार
भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण होणार आहे. मुख्यमंत्र्यांसह उद्या आम्ही पुतळ्याचे अनावरण करणार आहोत. आम्ही पुणेकर या संस्थेच्या मदतीने 41आरआर बटालियन -कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभा केला आहे. सीमेवरील सैन्य दररोज या पुतळ्याची पुजा करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार किंवा दृक-श्राव्य पद्धतीचा अनोखा पुतळा नव्या संसद भवनात उभारण्याचा मानस असल्याचेही मुनंगटीवार म्हणाले. यासह भविष्यात राज्यात शिवाजी महाराजांची माहिती देणारे जगातील सर्वात मोठे संग्रहालय तयार करणार आहे, असेही ते म्हणाले.