नवी दिल्ली – भारतीय सैन्यात काम करणाऱ्या महिला सैनिक, खलाशी आणि हवाई योद्ध्यांनाही आता प्रसूती रजा आणि बाल संगोपन रजा मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये महिला अग्निवीरचाही समावेश आहे.
आतापर्यंत, लष्करातील केवळ उच्च पदावरील महिला अधिकाऱ्यांना प्रसूती, बाल संगोपन आणि मूल दत्तक घेण्यासाठी रजा दिली जात होती. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, हा निर्णय सैन्यातील सर्व महिलांच्या सहभागाच्या अनुषंगाने आहे,
मग त्यांची श्रेणी काहीही असो. नियमांच्या विस्तारामुळे सैन्यात तैनात असलेल्या महिलांना कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांना सामोरे जाण्यास मोठी मदत होईल. याशिवाय लष्करातील महिलांच्या कामाच्या परिस्थितीतही सुधारणा होईल. त्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल साधू शकतील.
सरकारी आकडेवारीनुसार, मार्च 2023 पर्यंत भारतीय सैन्यात 7 हजारांहून अधिक महिला विविध पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये लष्करात 6 हजार 993 तर नौदलात 748 महिला अधिकारी आहेत. वैद्यकीय कर्मचारी वगळता भारतीय हवाई दलात महिला अधिकाऱ्यांची संख्या 1,636 होती.
यामध्ये मेडिकल कॉर्प्स, डेंटल कॉर्प्स आणि मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमधील महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. एका विशेष निर्णयादरम्यान सुमारे 108 महिलांना कर्नल पदावर बढती देण्यात येणार होती.