नवी दिल्ली – बिहारमधील निवडणूक निकालानुसार सत्तारूढ एनडीएची आगेकूच सुरू झाल्यानंतर कॉंग्रेस नेते उदित राज यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमेरिकेत ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका झाल्या असत्या; तर मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पराभूत झाले असते का, असा सवालही त्यांनी केला.
बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीची सरशी होणार असल्याचे भाकीत बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी केले. मात्र, निकाल हाती येऊ लागले तसे एनडीए सत्ता राखण्यात यशस्वी ठरणार असल्याचे संकेत मिळू लागले. त्याचा आधार घेऊन उदित राज यांनी एक ट्विट केले.
मंगळावर आणि चंद्रावर जाणाऱ्या उपग्रहांची दिशा पृथ्वीवरून नियंत्रित केली जाऊ शकते. मग, ईव्हीएम हॅक केले जाऊ शकत नाहीत का, असा दुसरा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. उदित राज हे माजी खासदार आहेत.
ते दिल्लीतून भाजपच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र, मागील वर्षीच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.