नवी दिल्ली -कॉंग्रेसने शनिवारी भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांशी करत असलेल्या सलगीवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. एवढेच नव्हे तर, कॉंग्रेसने चक्क वॉशिंग मशीनच पत्रकार परिषदेत आणून ठेवले. भाजपमध्ये प्रवेश करा; भ्रष्टाचाराची प्रकरणे बंद होतील या तत्वावर त्या पक्षाचे संपूर्ण स्वयंचलित वॉशिंग मशीन चालत असल्याची खिल्ली कॉंग्रेसने उडवली.
भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना नुकताच मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराचे प्रकरण सीबीआयने बंद केले. त्या पार्श्वभूमीवर, कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेतली.
त्यामध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या किंवा त्या पक्षाशी हातमिळवणी करणाऱ्या नेत्यांना भ्रष्टाचार प्रकरणी क्लीन चिट मिळत असल्याचा आरोप केला. वॉशिंग मशीन, डर्टी टी-शर्ट, मोदी वॉशिंग पावडर अशा प्रतिकात्मक साधनांचा वापर केल्याने ती पत्रकार परिषद लक्षवेधी ठरली.
वॉशिंग मशीनमध्ये भ्रष्टाचार, घोटाळा असे शब्द गिरवलेला डर्टी टी-शर्ट टाकण्यात आला. त्याचे रूपांतर भाजप-मोदी वॉश अशा स्वच्छ टी-शर्टमध्ये झाल्याचे दर्शवणारे प्रात्यक्षिक पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. सारे दाग चुटकियों में धुले अशी टॅगलाईन असणारी मोदी वॉशिंग पावडर नावाची पत्रकेही पत्रकार परिषदेत वाटण्यात आली.
आधी भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपनेच नंतर स्वच्छ केलेल्या पटेल यांच्यासारख्या किमान २१ बड्या नेत्यांची नावे सांगता येतील, असे खेडा यांनी म्हटले. उदाहरणादाखल त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांच्याबरोबरच नारायण राणे, अशोक चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ या नेत्यांची नावे घेतली.