पणजी – गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर कॉंग्रेसने दावा सांगितला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून इंडिया आघाडीत गोव्यावरूनही तणातणी होण्याची चिन्हे आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसने गोव्यातील प्रत्येकी एक जागा जिंकली. यावेळी कॉंग्रेस इंडियाचा घटक म्हणून निवडणुकीला सामोरा जाईल.
त्या आघाडीतील आणखी एक घटक असणारा आप गोव्यातील दोनपैकी एक जागा लढवण्यास उत्सुक आहे. अशात कॉंग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पक्ष दोन्ही जागांवरील दावा कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. गोव्यातील दोन्ही मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसला मोठा जनाधार आहे, असे त्यांनी म्हटले.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नुकताच गोवा दौरा केला. आगामी निवडणुकीसाठी आपच्या तयारीचा आढावा घेण्याचा त्या दौऱ्यामागील हेतू होता. आपला एक जागा लढवायची असल्याचे खुद्द केजरीवाल यांनीच नमूद केले. त्यामुळे दोन्ही पक्षांत गोव्यातील जागावाटपावरून सहमती होणार का, असा प्रश्न पुढे आला आहे.