नवी दिल्ली : विविध राज्यांत लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेसने निरीक्षकांची नियुक्ती केली. निरीक्षकांमध्ये अशोक गेहलोत (राजस्थान) आणि भुपेश बघेल (छत्तिसगढ) यांच्याबरोबरच मुकूल वासनिक आणि नितीन राऊत या महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश आहे.
पुढील काही महिन्यांत आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामीळनाडू आणि पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांसाठी सज्ज होत असलेल्या कॉंग्रेसने बुधवारी निरीक्षकांची नियुक्ती केली. निवडणूक प्रचाराच्या व्यवस्थापनाची आणि समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
केरळचे निरीक्षक म्हणून गेहलोत, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फलेरो आणि कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी.परमेश्वर काम पाहतील. बघेल, वासनिक आणि शकिल अहमद खान या नेत्यांना आसामचे निरीक्षक बनवण्यात आले आहे.
तामीळनाडू आणि पुद्दुचेरीच्या निरीक्षकपदी एम.वीरप्पा मोईली आणि एम.एम.पल्लम राजू या माजी केंद्रीय मंत्र्यांबरोबरच महाराष्ट्राचे मंत्री राऊत यांची नियुक्ती करण्यात आली. बी.के.हरीप्रसाद, आलमगीर आलम आणि विजयइंदर सिंगला पश्चिम बंगालचे निरीक्षक असतील. निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या राज्यांपैकी केवळ पुद्दुचेरीत (केंद्रशासित प्रदेश) कॉंग्रेसची सत्ता आहे.