नवी दिल्ली : बॅंकांना फसवून फरार झालेला डायमंड ज्वेलर्स निरव मोदी याच्या विरोधातील अंमलबजावणी संचनालयाने दाखल केलेल्या दोन खटल्यात माफीचा साक्षिदार होण्याची इच्छा व्यक्त करणारा अर्ज मोदीची बहीण आणि तिच्या पतीने सादर केला आहे. हा अर्ज न्यायलयाने मंजूर केल्याने त्यांना माफीचा साक्षिदार होता येईल.
पुर्वी मेहता आणि त्यांचा पती मयंक मेहता यांनी हे अर्ज गेल्या महिन्यात केले आहेत. आपल्याला निरव मोदी यांच्यापासून अंतर ठेवून वागायचे आहे आणि त्यासाठी आपण त्याचे व्यवहार आणि त्याच्या बाबातीत महत्त्वाचे आणि पुरेसे पुरावे देऊ शकतो, असे त्यात म्हटले आहे.
पुर्वी ही बेल्जियम नागरिक असून मयंक हा ब्रिटिश नागरिक आहे.निरव मोदी याच्या कथित गुन्हेगारी कृत्यांमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामूळे अंमलबजावणी संचनालयाने दाखल केलेल्या खटल्यात त्यांना साक्षिदार म्हणून तपासण्यात यावे. निरव आणि त्याच्या साथिदारांविरोधात ज्या गोष्टी सिध्द करण्यास कठीण जाईल, असे गौप्यस्फोट आपण करू.
बनावट हमीपत्रे सादर करून पंजाब नॅशनल बॅंकेत सहा हजार 498 कोटी 20 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पुर्वी आणि मयंक यांची नावे सीबीआयच्या आरोप पत्रात नाही. मात्र अंमलबजावणी संचनालयाच्या आरोपपत्रात त्या दोघांना सह आरोपी करण्यात आले आहे.
त्यांच्या व्यक्तीगत जबाबदारीवर त्यांना माफीचा साक्षिदार होण्यास हरकत नसल्याचा खुलासा अंमलबजावणी संचनालयाने केला आहे. मात्र अन्य कोणत्याही कंपनी अथवा व्यवसायास माफी देण्यास हरकत नोंदवली आहे.
करोनाच्या निर्बंधामुळे आपण भारतात प्रवेश करू शकत नाही. मात्र त्यांचे जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवता येतील. न्यादंडाधिकाऱ्यांपुढेही आपण असा जबाब नोंदवण्यास तयार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पूर्ण आणि सत्य कथन करण्याच्या अटीवर विशेष न्यायधिश व्ही सी बर्डे यांनी मान्यता दिली. आपल्या व्यक्तीगत अधिकारात ही सवलत देत आहोत, असे न्यायलयाने स्पष्ट केले आहे.