पुणे – शहरातील करोनाच्या नव्या बाधितांची संख्या घटली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील वीकेंड लॉकडाऊन रद्द केला. मात्र, याबाबतच्या आदेशात बॅंकांबाबत उल्लेख नसल्याचे, तसेच आदेश मिळाला नसल्याचे कारण देत शहरातील अनेक बॅंका शनिवारी बंद होत्या.
त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागला.
बॅंकांना प्रत्येक महिन्यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. त्यामुळे शनिवार व रविवार ज्या नागरिकांना सुट्टी असते, त्यांना महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बॅंकाची कामे करता येतात. तर क्वचित पाचवा शनिवार नागरिकांना आर्थिक व्यवहरांसाठी मिळतो.
मात्र, शहरात एप्रिलपासूनच वीकेंड लॉकडाऊन लागू होता. त्यामुळे तिसऱ्या शनिवारी बॅंका बंद ठेवण्याचे आदेश होते. मात्र, आता महिना अखेर असताना; या महिन्यात पाचवा शनिवार आला होता. त्यातच प्रशासनाने शुक्रवारी आदेश काढत वीकेंड लॉकडाऊन रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र, याबाबत आदेशात बॅंकांचा समावेश नव्हता. तसेच बॅंकांना नव्या नियमाबाबत कळवण्यातही आले नाही. त्यामुळे पुण्यातील जवळपास अनेक बॅंका शनिवारी बंदच राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली. त्याचवेळी कोल्हापूर, औरंगाबादसारख्या शहरांत मात्र शनिवारी बॅंका सुरू होत्या.
वीकेंड लॉकडाऊनमुळे या महिन्यात शनिवारी बॅंकाच बंद ठेवण्यास सांगण्यात आले. त्यामुळे किमान या महिन्यात पाचव्या शनिवारी बॅंका सुरू राहतील, अशी सर्वसामान्यांना अपेक्ष होती. मात्र, प्रशासकीय आदेशात बॅंकांचा समावेश नसल्याने तसेच आदेशाबाबत संभ्रम असल्याने बॅंका बंद राहिल्या. त्यामुळे तातडीने आदेशात सुधारणा करावी. आता पुढील महिन्यात पहिल्या शनिवारी बॅंका सुरू करण्यासाठी आदेश काढावेत.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच