नगर – नगरसेवकपद रद्द करण्याच्या निर्णयाचे पत्र आपल्याला मिळाले आहे. विद्यमान की पूर्वीचे नगरसेवकपद रद्द केले, याबाबत पत्रात संभ्रम आहे. यांसदर्भात मनपा प्रशासनाला पत्र देऊन विचारणा करणार असल्याचे श्रीपाद छिंदम याने सांगितले. 26 फेब्रुवारी 2018 रोजीच्या महासभेच्या ठरावात भविष्यातील पद रद्द करण्याचा कोणताही उल्लेख नसल्याचे छिंदमने म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी छिंदम याचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 13 (1) नुसार कारवाईस पात्र ठरतात, असा निष्कर्ष काढून महापालिका अधिनियमातील याच कलमानुसार छिंदमचे विद्यमान नगरसेवकपद रद्द करण्याचा आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिला. याबाबत छिंदम म्हणाला, नगरविकास मंत्री हे वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांच्या निर्णयाबाबत बोलणे उचित होणार नाही. या निकालाविरोधात अद्याप मी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
26 फेब्रुवारी 2018 रोजीच्या महासभेत ठराव झालेला आहे. मला खुलासाही याच ठरावाच्या अनुषंगाने मागविण्यात आला होता. त्या ठरावात भविष्य काळातील पद रद्द करण्याचा उल्लेख नाही. डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. पत्रात स्पष्ट उल्लेख नसल्याने संभ्रम आहे. त्यामुळे मनपाला पत्र देणार असून खुलासा विचारणार आहे.