जामखेड – जामखेड शहरातील बीड रस्त्यावर पुन्हा एकदा आज सकाळी गोळीबार झाला. पूर्वीच्या किरकोळ वादातून भुतवडा येथील बाळू दादा डोके या तरुणाला गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. पण डोके याने गोळी झाडणाऱ्याचा हात झटकल्याने गोळी हवेत उडाली. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. या गोळीबारामुळे पुन्हा एकदा जामखेड शहर हदरले असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवून दोघा जणांना अटक केली आहे.
जामखेड शहरातील गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच शनिवारी सकाळी अकराच्या दरम्यान बीड रस्त्यावरील फॅशन वर्ल्ड या कापडाच्या दुकानासमोर बाळू दादा डोके याच्याबरोबर विकास बाबासाहेब थोरात व विशाल मगर यांनी पांढऱ्या रंगाच्या वाहनावर येऊन पूर्वीच्या झालेल्या भांडणावरून भांडण सुरू केले. यावेळी विकास थोरात हा बाळू डोके व त्याच्या भावाला लाथाबुक्क्याने मारहाण करुन आज तुझा काटाच काढतो.
आज कोण काय करतो? ते पाहतो, असा जोरजोराने आरडाओरडा केला. दरम्यान विकास थोरात याच्या कमरेला असणारे पिस्तूल काढले आणि बाळू डोकेच्या दिशेने गोळी झाडली. मात्र डोके याने गोळीची दिशा चुकविली. त्यामुळे डोके बंधूंचा जीव वाचला. यावेळी झालेल्या आरडाओरडा व गोंधळामुळे मोठ्या संख्येने गर्दी झाली. या गर्दीचा फायदा घेवून विकास थोरात व विशाल मगर गाडीवरून घटनास्थळापासून पसार झाले. जामखेड शहरातील दोन वर्षांपूर्वी आठवडे बाजारात भरदिवसा गोळीबार करून योगेश राळेभात, राकेश राळेभात या तरुणांची गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली होती.
त्या घटनेनंतर काही काळानंतर जामखेड शहरातील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सादीक पठाण त्याचप्रमाणे राकेश व योगेश राळेभात यांच्यावरील गोळीबाराची घटना ताजी असतानाच आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भुतवडा येथील बाळू डोके याच्यावर पूर्वीच्या किरकोळ वादातून तालुक्यातील सावरगाव येथील विकास थोरात याने गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व गोळीबार केल्यानंतर अरोपी तात्काळ फरार झाला. मात्र सुदैवाने त्यात बाळू डोकेने हाताने पिस्तुलाला झटका दिल्याने गोळीची दिशा चुकल्याने तो वाचला.
या संदर्भात बाळू डोके यांच्या फिर्यादी नुसार जामखेड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, विकास बाबासाहेब थोरात व विशाल मगर यांच्या विरोधात खूनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर पोलीस अधीक्षक सागर पाटील व पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली असता घटनेचा रीतसर पंचनामा करून माहीती घेऊन तपास सुरू केला.
पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या आदेशानुसार आरोपीच्या तपासासाठी स्वतंत्र पोलिसांचे तीन पोलीस पथके रवाना करण्यात आली. पोलिसांनी विकास थोरात व विशाल मगर यांना अट केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, हे कॉ बापूसाहेब गव्हाणे, अजिनाथ बडे, गणेश गाडे, अल्ताफ शेख, राठोड हे करत आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जामखेडमधील कायदा व सुव्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहेत.