पुणे – पादचारी हा रस्त्याचा राजा असतो, असे सांगत महापालिकेकडून शहरात 11 डिसेंबरला 21 ठिकाणी पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. मात्र, त्याच वेळी शहरातील वाढती खासगी वाहनांची संख्या, बेशिस्त वाहनचालक तसेच पदपथावरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते, त्यामुळे पादचारी दिनासाठी शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांवर 51 ठिकाणी पादचारी सिग्नल बसविण्यात येणार होते. मात्र, या कामांची अवघ्या 39 लाखांची निविदा वित्तीय मान्यतेसाठी पडून आहे. त्यामुळे महापालिकेला खरचं पादचाऱ्यांची काळजी आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरात गेल्या काही वर्षात खासगी वाहनांची संख्या लक्षणीय स्वरूपात वाढली आहे. त्यातच, अनेक भागात मेट्रो, उड्डाणपूलाची कामे सुरू असल्याने रस्त्यांवर प्रचंड अडथळे असून सातत्याने वाहतूक कोंडी होते तर अनेक वर्दळीच्या प्रमुख चौकात वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवतात त्यामुळे शालेय विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने शहरात पादाचाऱ्यांना सुरक्षित रस्ते करणे तसेच वाहतुकीत पादचाऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी रस्ते विकसित केले जात आहेत.
नागरिकांनी चालण्यासाठी प्राधान्य द्यावे म्हणून 11 डिसेंबरला पादचारी दिन साजरा केला जात आहे. यावर्षी 21 रस्त्यांवर पादचारी दिन साजरा केला जाणार असून, त्यासाठीची तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून पथ विभागाने विद्युत विभागाला चौकांची यादी देऊन त्या ठिकाणी पादचारी सिग्नल बसवावेत, अशा सूचना केल्या होत्या. तसेच अतिरिक्त आयुक्तांकडूनही त्याबाबत सूचना दिल्या.त्यानुसार विद्युत विभागाने ठिकाणी पादचारी सिग्नल बसविण्याच्या कामासाठी 39 लाख रुपयांची निविदा काढली पण त्यास अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील प्रक्रिया न झाल्याने पादचारी दिन आला तरी सिग्नल बसलेले नसल्याचे समोर आले आहे.
यामुळे, एका बाजूला शहरातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी तब्बल 300 कोटींच्या निविदा अवघ्या दोन आठवड्यात काढणाऱ्या प्रशासनाला पादचाऱ्यांच्या सिंग्नलसाठीच्या 39 लाखांच्या निविदांसाठी मात्र वेळ नसल्याने पादचारी केवळ 11 डिसेंबरचा पादचारी दिन साजरा करण्यापूरताच एक दिवसाचा रस्त्याचा राजा असल्याचे चित्र शहरात आहे.
“या रस्त्यांवर’ बसविणार 51 पादचारी सिग्नल
फर्गुसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, सेनापती बापट रस्ता, राजभवन रस्ता, लाल बहादूर शास्त्री रस्ता, बाजीराव रस्ता, पेशवे पथ, सोलापूर रस्ता,
पाषाण रस्ता, कर्वे रस्ता, एनडीए रस्ता, पौड रस्ता.