कोल्हापूर: सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील पदवीधर मतदार नोंदणी जास्तीत जास्त प्राधान्याने पूर्ण करावीत. 5 नोव्हेंबर रोजी त्याबाबत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ मतदार नोंदणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहू सभागृहात सर्व कार्यालय प्रमुखांची आज बैठक घेण्यात आली. उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी सुरुवातीला संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. यामध्ये कार्यालय प्रमुखांनी सेवापुस्तकांची साक्षांकित प्रत सोबत जोडावी. तसेच एकत्रित मतदार नोंदणीबाबत पत्र द्यावे. 6 नोव्हेंबर ही मतदार नोंदणीची अंतिम तारीख आहे. 31 ऑक्टोबर 2016 पर्यंत प्राप्त पदवीधर यासाठी नोंदविला जाईल. त्याचबरोबरच 1 नोव्हेंबर 2013 ते 1 नोव्हेंबर 2019 या कालावधीत शिक्षण म्हणून तीन वर्षे सेवा केलेल्या शिक्षकाची शिक्षक मतदार संघात नोंदणी करण्यात येईल.
जिल्हाधिकारी देसाई यावेळी म्हणाले, सर्व कार्यालय प्रमुखांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी. सर्व मतदारांचे एकत्र अर्ज कार्यालय प्रमुखाच्या पत्रासह संबंधित तहसिलदार, प्रांताधिकारी, गट विकास अधिकारी, महापालिका उपायुक्त तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करु शकतात. याकामास कार्यालय प्रमुखांनी प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर आपल्या कार्यालयात एकही पदवीधर मतदार नोंदणी करण्यास राहिला नसल्याबाबत 5 नोव्हेंबर रोजी प्रमाणपत्र सादर करावे.
याबैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, प्रियदर्शनी मोरे, उप जिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर, प्रांताधिकारी वैभव नावाडकर, तहसिलदार अर्चना शेटे आदी उपस्थित होते.