मुंबई – पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनावर मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष कर असल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढून महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर कमी करून इंधन स्वस्त करण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह बॅंकेने पुन्हा व्यक्त केली आहे.
पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, आम्ही या अगोदरही सरकारला इंधनाचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली आहे. आता हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकारवर अवलंबून आहे. केंद्र सरकारने डाळी आणि खाद्य तेलाचा पुरवठा वाढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील महागाई कमी होण्याची शक्यता आहे.
यावर्षी पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक बाजारात कमी असताना केंद्र सरकारने या इंधनावरील करात मोठी वाढ केली. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा झाली आहे. आता पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपयापेक्षा जास्त झाल्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. मात्र दरम्यानच्या काळामध्ये जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढू लागले आहेत.
त्या प्रमाणामध्ये तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करीत आहेत. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्राबरोबरच राज्यांचे कर असतात. कोणी किती कर कमी करावे या संदर्भात या अगोदर झालेल्या जीएसटी परिषदेत चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी निर्णय होऊ शकला नाही.
त्यामुळे नजीकच्या भविष्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र यामुळे महागाईचा दर मोठ्या प्रमाणात वाढला तर त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा बऱ्याच विश्लेषकांनी या अगोदर दिलेला आहे.