शिरूर -शिरूर तालुक्यात अनेक गुणवत्ताधारक तरुण आहेत. परंतु स्थानिकांच्या भीतीमुळे त्यांना नोकरी मिळत नाही, अशांना आता दिलासा मिळणार आहे. तालुक्यातील स्थानिक तरुणांना रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये नोकऱ्या देण्यासाठी कंपन्या होकारार्थी आहेत, असे प्रतिपादन आमदार अशोक पवार यांनी केले.
रांजणगाव (ता. शिरूर) येथे आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली कंपन्यांबरोबर बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ब्रिटानिया कंपनीचे मतीन सय्यद, एलजी इलेक्ट्रॉनिक कंपनी, आयटीसी कंपनी, हायर कंपनी या चार कंपनींचे मनुष्यबळ अधिकारी उपस्थित होते.
अशोक पवार म्हणाले की, रांजणगाव औद्योगिक वसाहतीतमध्ये स्थानिक तरुणांना येथील कंपन्या नोकरी देत असतील तर तरुणांनी यात सहभागी होऊन कंपनी व्यवस्थापन यांना कायमस्वरूपी सहकार्य करण्याची भावना ठेवावी. त्यामुळे आपल्या भागातील तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. पुढील पिढीलाही त्याचा उपयोग होणार आहे. नोकरी करताना तालुक्यातील तरुणांनी संयम बाळगायला हवा. कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक तरुणांना इतर कामगारांसारखे वागणूक द्यावी, अशी सूचनाही त्यांनी कंपनी व्यवस्थापनास केली.
चार कंपन्यांच्या मनुष्यबळ अधिकाऱ्यांनी स्थानिक तरुणांना सहभागी करून घेण्यासाठीची होकार दिला आहे. त्यासाठी लवकरच त्यांना हव्या असलेल्या गुणवत्तेनुसार कामगारांची यादी कंपनी व्यवस्थापन देणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात काही तरुणांना नोकरी देऊ शकतो. इतर कंपन्यांसाठी लवकरच आणखी एक बैठक बोलावण्यात येणार आहे. यासाठी प्रांताधिकारी देशमुख आग्रही आहेत.
अधिकारी म्हणतात तरुणांची दहशत
बैठकीत प्रथम कंपन्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक तरुणांना नोकरी देण्यास सकारात्मकता दाखवली. स्थानिक तरुणांकडून दहशत निर्माण केली जाते, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यासाठी नियमावली करावी, असे बैठकीत ठरले. तर तरुणाच्या दहशतीवर नियंत्रण ठेवले तर स्थानिक तरुण कंपनी व्यवस्थापनाला कामासाठी लागतीलच, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.