नगर – प्राथमिक शाळांमध्ये अस्तित्वात असलेल्या विविध शालेय समित्यांचे शिक्षण संचालक प्राथमिक यांनी पुनर्गठन केले असून तसा अहवाल महाराष्ट्र शासनास सादर केला आहे. लवकरच महाराष्ट्र शासनाकडून समिती पुनर्गठणाबाबत निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी दिली.
संघाने 4 ऑक्टोबर 2018 रोजी शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांना शिक्षण संचालनालय ,पुणे येथे समक्ष भेटून विविध शालेय समित्यांचे पुनर्गठण करण्याची मागणी केली होती. रि टेमकर यांनी त्यांच्या 9 ऑक्टोबर 2018रोजीच्या पत्रानूसार 22ऑक्टोबर 2018 रोजी पुणे येथे राज्यातील अहमदनगर, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर या जिल्हा परिषदेतील काही निवडक अशा 15 तज्ज्ञ शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व सहशिक्षक यांच्या बैठकीतील सूचना विचारात घेऊन महाराष्ट्र शासनास अहवाल सादर केला आहे.
शासनास सादर केलेल्या अहवालामध्ये शिक्षण संचालक प्राथमिक यांनी अस्तित्वात असलेल्या सर्व समित्यांची रचना, त्यांचे कार्य , त्यांमधील सदस्यसंख्या याबाबत विस्तृत विवेचन केले आहे. शालेय स्तरावर विविध समित्या आस्तित्वात असल्यामुळे मुख्याध्यापकांना व ज्येष्ठ शिक्षकांना समितीची बैठकांचे नियोजन करणे आदी कामांमुळे शालेय कामकाजामधील अध्यापनाचा खूप वेळ वाया जातो.