पं. स. सभापती आव्हाड, उपसभापती मोरे, भाजपचे जिल्हा उपाध्याक्ष मोरे राष्ट्रवादीत
जामखेड – पालकमंत्री राम शिंदे यांना सध्या जोरदार राजकीय धक्के बसत आहेत. त्यातच पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती राजश्रीताई मोरे, भाजपचे जिल्हा उपाध्याक्ष सूर्यकांत मोरे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्जत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. त्यामुळे तालुक्यात राजकीय भूकंप झाला. पालकमंत्री शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केल्याने पालकमंत्र्यांना जोरदार धक्के बसत आहेत. कर्जत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार मेळाव्यात जामखेड पंचायत समितीचे विद्यमान सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती राजश्री सूर्यकांत मोरे व त्याचे पती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे तसेच पालकमंत्री राम शिंदे यांचे खासगी स्वीय सहायक अशोक धेंडे, अमृत महाराज डुचे यांचा माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजप कर्जत युवा तालुकाध्यक्ष शिवकुमार सायकर यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यावेळी सभापती आव्हाड म्हणाले, माझी भाजपमध्ये घुसमट होत होती. आजपर्यंत अपमान सहन करत होतो. आज मी खऱ्या अर्थाने मोकळा झालो आहे. आज मला खरी झोप लागेल. रोहित पवार यांच्यामुळे मला पक्षात येण्याची संधी मिळाली आहे. सूर्यकांत मोरे म्हणाले, गेल्या दहा वर्षांतील माझी खदखद आज बाहेर आली आहे. आम्ही दिल्लीची सत्ता सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बिनशर्त आलो आहे. आता राष्ट्रवादीचे स्टेज मोठे करा. आता माझ्या मागे रांग लागणार आहे, असे सांगत त्यांनी अनेक जण पक्षांतर करणार असल्याचे संकेत दिले.