राष्ट्रीय ‘क्‍वांटम तंत्रज्ञान’ मोहिमेमध्ये आयुकाचा सहभाग

प्रीसिजन आणि क्‍वांटम मापन प्रयोगशाळेत “ऑप्टिकल आण्विक घड्याळ’ स्थापित होणार


लायगो इंडिया संशोधन प्रकल्पासाठी क्षमता विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल

पुणे – आंतर-विद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) आता केंद्र सरकारच्या क्‍वांटम तंत्रज्ञान तसेच आंतरविद्याशाखीय सायबर फिजिकल सिस्टिम्सवरील संशोधन मोहिमेमध्ये सहभागी होत आहे. यामुळे आपल्या देशाला सध्या जगभरात होत असलेल्या क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देता येणार आहे.

आयुकातील वैज्ञानिक प्रा. शुभदीप डे यांच्या पुढाकाराने अत्याधुनिक अशा प्रीसिजन आणि क्वांटम मापन प्रयोगशाळा (पीक्‍यूएम-लॅब) स्थापित होण्याच्या मार्गावर आहे. पीक्‍यूएम-लॅबमध्ये ऑप्टिकल “आण्विक घड्याळ’ कार्यरत असेल. ज्यामध्ये असाधारण अचूकता आहे आणि त्यातील लंबकाचा ठोका विश्‍वाचे वय (13.8 अब्ज वर्षे) असलेल्या काळात कदाचित एकदाच चुकत असेल.

“पीक्‍यूएम-लॅब’मध्ये भविष्यात विकसित होणारे तंत्रज्ञान लेजर इंटरफेरोमीटर गुरुत्त्वीय लहरी वेधशाळा (लायगो) या राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या वैज्ञानिक संशोधन प्रकल्पांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल. “लायगो’साठी आयुका ही अनेक संस्थांपैकी एक समन्वयक संस्था आहे. पीक्‍यूएम-लॅबमधील संशोधन आणि विकास सुविधांमुळे भविष्यातील अत्याधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रकल्पांवर काम करण्याच्या दृष्टीने कुशल मनुष्यबळ तयार करणे. तसेच लायगो व थर्टी मीटर दुर्बीण (टीएमटी) या मोठ्या प्रकल्पांचे सुनियोजित व्यवस्थापन करणे शक्‍य होणार आहे, अशी माहिती आयुकातर्फे देण्यात आली.

गेल्या शंभर वर्षांमध्ये, क्वांटम मेकॅनिक्‍स या विद्याशाखेच्या पायाभरणीपासूनच प्रचंड प्रगती झाली आहे. या संशोधनाच्या पुढच्या टप्प्यात आयुका, पुण्यातील आयसरबरोबर भागीदारीमध्ये एका महत्त्वाच्या प्रकल्पात काम करत आहे. यामध्ये क्वांटम तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या दोन्ही संस्थांच्या संयुक्त सहकार्य व भागीदारीने अल्ट्रा-स्टेबल ऑप्टिकल फायबर लिंक (क्वांटम चॅनेल)ची स्थापना करण्यात येईल. देशात एकमेव “आयुका-आयसर पुणे क्वांटम चॅनेल’ मार्फत दोन्ही संस्थांमधील प्रयोगशाळांच्या दिशेने प्रकाशकण (फोटॉन्स) प्रवाहित केले जातील.

याद्वारे आयुकातील आण्विक घड्याळाचा आयसर येथील प्रा. उमाकांत रापोल यांच्या प्रयोगशाळेत विकसित झालेल्या स्ट्रॉन्शियम आण्विक घड्याळाबरोबर संवाद आणि संपर्क स्थापित करण्यात येईल. या अत्याधुनिक क्वांटम चॅनेलद्वारे मूलभूत विज्ञान तंत्रज्ञानाच्या सर्वोच्च पातळीवर अभ्यासणे शक्‍य होईल. या फायबर लिंकद्वारे भारतातील संशोधक गटांना विविध क्वांटम संवाद सिद्धांत सुद्धा तपासणे शक्‍य होणार आहे.

दरम्यान, क्वांटम तंत्रज्ञान व मूलभूत संशोधनावर उपक्रम राबविण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 8000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. “पीक्‍यूएम-लॅब’मध्ये विकसित केले जाणारे ऑप्टिकल आण्विक घड्याळ कदाचित देशातील पहिलेच असेल आणि क्वांटम तत्त्वावर आधारित तंत्रज्ञानाचा पुढील विकास करण्यासाठी अपरिहार्य असेल. या प्रयोगशाळा आणि इतर अत्याधुनिक सुविधांमुळे मूलभूत विज्ञानातील संशोधनात नवी भरारी मारणे शक्‍य होणार असल्याची माहिती आयुकाने दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.