पुणे – महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना गुरुवारी दुपारी उच्च रक्तदाबाचा अचानक त्रास झाला. त्यामुळे, अस्वस्थ वाटू लागल्यानंतर आयुक्त कुमार यांच्यावर महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर, आयुक्तांच्या करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत काळजीचे कारण नसल्याचे समोर आल्यानंतर आयुक्तांना घरी सोडण्यात आले.
महापालिका आयुक्तांची काही नगरसेवकांसमवेत दुपारी साडेचारच्या सुमारास बैठक सुरू होती. यावेळी आयुक्तांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांना ही बाब कळविली, त्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालय गाठले.
त्यावेळी केलेल्या तपासणीत आयुक्तांचा रक्तदाब वाढल्याचे निदर्शनास आले. हा रक्तदाब धोकादायक पातळीपेक्षा अधिक असल्याने त्यांना घाम फुटण्यासह, छातीतही दुखण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना तातडीने पुढील तपासण्यासाठी दवाखान्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला.