शिरूर -जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार पेट्रोलपंप बंद केले असताना शिरूर शहरात व तालुक्यात टुकार फिरणाऱ्या तरुणांना व विनाकारण गर्दी करणाऱ्या नागरिकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळते कसे? हा संशोधनाचा विषय बनला आहे.
सध्या शासनाने पेट्रोल, डिझेल नागरिकांना बंद केले असून केवळ शासकीय अधिकारी व करोना व्हायरस संदर्भात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पेट्रोल डिझेल देण्याची सांगितले आहे; परंतु शिरूर तालुक्यासह शिरुर शहरामध्ये शासनाच्या या आदेशाला हरताळ फासल्यासारखे चित्र दिसून आले आहे. शिरूर तालुक्यात आणि शिरूर शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची गरज रोजच वाढत आहे. अनेक नागरिक आपली दुचाकी व चारचाकी घेऊन विनाकारण शहरात फिरताना दिसत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून शासनाने पेट्रोल-डिझेल या नागरिकांसाठी बंद केले असताना यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल येते कुठून? हे शोधणे गरजेचे आहे. शिरूर शहराबाहेर चार ते पाच पेट्रोल पंप अस्तित्वात असून तसेच शिरूर शहरात दोन पेट्रोल पंप अस्तित्वात असून पुणे-नगर रस्त्यावर शिरूर पुण्यापर्यंत अनेक पेट्रोल पंप आहेत.
शिरूरवरून पाच सहा किलोमीटर अंतरावर पारनेर, श्रीगोंदा हद्दीत दोन तीन पेट्रोल पंप आहेत. जर हे पेट्रोल पंप पेट्रोल, डिझेल देत नसतील तरी या भागातील नागरिक शिरूर शहरात किंवा शिरूर तालुक्यातील इतर भागात जाऊ शकत नाही. त्यामुळे या भागातील पेट्रोल पंप चालू किंवा पेट्रोल पंपावरील कर्मचारी जादा भावाने पेट्रोल ग्राहकांना देत असतील? असा संशय आहे.
शिरूर पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या व गर्दी करणाऱ्या नागरिकांना पेट्रोल, डिझेल कुठे भरले? याची विचारणा करणे गरजेचे आहे, त्यातून आपल्याला यांना डिझेल पेट्रोल देणारा पेट्रोल पंप चालक सापडू शकेल. यासाठी शिरूर, रांजणगाव व शिक्रापूर पोलिसांनीही सतर्क राहून पेट्रोल पंप चालकांची चौकशी करावी.
लॉक डाऊनच्या काळात पेट्रोल, डिझेल पंपाने आदेशाचे पालन करावे अन्यथा कारवाई केली जाईल. जनतेने घराबाहेर पडू नये, प्रशासनाला सहकार्य करीत कुटुंबाला सुरक्षित ठेवा; मात्र नाहक बाहेर फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सोशल डिस्टन्स पाळा, अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडा अन्यथा कठोर पावले उचलली जातील.
– लैला शेख, तहसीलदार शिरूर