पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक शुल्कात जवळपास 25 टक्के कपात केली आहे. त्याचधर्तीवर सर्वच पारंपरिक विद्यापीठांना शैक्षणिक शुल्क कमी करण्याच्या सूचना मंत्रालयस्तरावर सोमवारी (दि.28) होणाऱ्या कुलगुरूंच्या बैठकीत दिले जातील, अशी ग्वाही उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिली.
त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह सर्व विद्यापीठांकडून करोनाच्या संकटात शैक्षणिक शुल्क कमी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, खासगी विद्यापीठ व महाविद्यालयांना शुल्क कपात करण्यावरून शुल्क नियामक प्राधिकरण निर्णय घेतील, असे सांगत उदय सामंत यांनी सावध पवित्रा घेतला आहे.
उच्च शिक्षणमंत्री सामंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना करोनाच्या पार्श्वभूमीवर शुल्क कमी करण्यासंदर्भात राज्य शासनाची भूमिका मांडली. राज्य शासनाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील शुल्क 25 टक्के कमी केले.
त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेही शैक्षणिक शुल्क कमी करीत पालकांना दिलासा दिला. त्याच पद्धतीने अन्य विद्यापीठांनी निर्णय घेतला पाहिजे. यासंदर्भात सर्व कुलगुरूंची सोमवारी बैठक होत आहे. त्यांच्याशी चर्चा करून शुल्क कपातीबाबत सूचना केल्या जातील.
सध्या ऑनलाइन शिक्षणामुळे ग्रंथालय, वीज, इमारत देखभाल, प्रयोगशाळा, क्रीडांगणसह अन्य शुल्क कमी करणे शक्य आहे. त्याचा विचार करून शुल्क कपातीचा निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले.
खासगी विद्यापीठाचे शुल्क कमी करण्यावर साशंक
व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या खासगी विद्यापीठ व महाविद्यालयाचे शुल्क निश्चित करण्याचे काम शुल्क नियामक प्राधिकरणाद्वारे होते. या संस्थांची शुल्क कमी करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. मात्र, प्राधिकरण ही स्वायत्त असून, त्यात हस्तक्षेप करता येत नाही. निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाची समितीची असून, त्यांना शुल्क कमी करण्याबाबत सांगितले जाईल. मात्र, त्याबाबत सर्व अधिकार प्राधिकरणाचे असतील. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करता शुल्क कपातीबाबत सुवर्णमध्य काढला जाईल; आणि प्राधिकरणाकडून राज्य सरकार प्रस्ताव मागवून घेणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
15 सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात?
राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. हा विचार करता येत्या 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.