श्रीनगर – जम्मू येथील हवाई दलाकडून वापरल्या जाणाऱ्या विमानतळावर शनिवारी मध्यरात्री दोन भयंकर स्फोट झाले. या स्फोटामुळे उडालेल्या तुकड्यामुळे दोन जण किरकोळ जखमी झाले. जम्मू काश्मिर पोलिसांनी बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली (दहशतवाद प्रतिबंधक कायदा) गुन्हा नोंद केला आहे.
पहिला स्फोट रात्री एक वाजून 37 मिनिटांनी झाला तर दुसरा स्फोट एक वाजून 42 मिनिटांनी झाला. तेथे उपस्थित असणाऱ्या कोणत्याही सामुग्रीचे नुकसान झालेले नाही. या बाबत तपास सुरू करण्यात आला आहे. त्याचा तपशील अद्याप हाती आला नाही, असे संरक्षण खात्याचे जनसंपर्क अधिकारी लेफ्ट. कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले.
दुसऱ्या प्रकरणाच्या तपासासाठी जम्मूत असणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रनेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन तपास सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीहून राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे पथकही जम्मूत दाखल झाले आहेत.
या घटने संदर्भात संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल एच. एस. अरोरा यांच्याशी या घटनेसंदर्भात चर्चा केली आहे. एअर मार्शल विक्रमसिंग हे घटनास्थळावर दाखल झाले असून ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. या घटनेनंतर जम्मू क्षेत्रात अतिसतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.
घटनास्थळाच्या जवळच्या भागातून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांचे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तातडीने पाठवण्यात आले. त्याचबरोबर स्फोटक तज्ज्ञही घटनास्थळावर दाखल झाले आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
संशयित दहशतवाद्याला अटक
त्रिकुतानगर मध्ये एका शॉपिंग मॉल जवळ फिरणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली. त्याच्या जवळ दूरनियंत्रकाने स्फोट घडवता येण्याजोगा बॉम्ब जप्त करण्यात आला आहे. या बॉम्बचे वजन सुमारे पाच किलो असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी सांगितले. या दहशतवाद्या सोबत असणाऱ्या स्थानिक नागरिकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.