पक्षनेते, पदाधिकारी, आयुक्तांसह अधिकाऱ्यांसह घेतली बैठक
पुणे – शहरासाठी ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रशासन आणि पक्षनेते एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी सांगितले. शहरातील सद्यस्थितीबाबत महापौरांनी पक्षनेते, पदाधिकारी, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आरोग्य आणि त्यासंबंधी विभागाच्या अधिकाऱ्यांची बुधवारी महापौर बंगल्यात बैठक घेतली. या बैठकीत शहराची एकूण करोना स्थिती, बेडची उपलब्धता, बेडचे व्यवस्थापन, सध्या असलेली ऑक्सिजनची स्थिती, रेमडेसिविरचा तुटवडा या विषयांवर चर्चा झाली.
“सध्या शहराची परिस्थिती एकदम नाजूक आहे. अशा स्थितीत प्रशासनावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आणि त्यांनी काय करायला हवे होते हे सांगत बसण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्रित ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाला सोबत घेऊन काम करायचे आहे,’ असे मोहोळ म्हणाले.
…तोपर्यंत नवीन रुग्ण नकोत
जोपर्यंत ऑक्सिजन पुरवठ्याबाबत शाश्वतता निर्माण होत नाही, तोपर्यंत करोनावरील उपचारासाठी नवीन ठिकाणी तयार असलेल्या बेड करोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करू नये, असा निर्णय आज गटनेत्यांच्या आढावा बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
गरज असलेल्या रुग्णांनाच रेमडेसिविर इंजेक्शन दिल्यास तुटवडा काही अंशी नियंत्रणात येऊ शकतो, त्यामुळे तशी यंत्रणा निर्माण करण्याची मागणी पक्षनेत्यांनी या बैठकीत केली.