CM Arvind Kejriwal – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेविरोधात आणि ट्रायल कोर्टाने ईडीला दिलेल्या रिमांडविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी आपल्या याचिकेत उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली असून उद्याच सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. (cm kejriwal reached high court against arrest and remand requested for hearing of petition tomorrow)
केजरीवाल यांनी आपल्या याचिकेत असा युक्तिवाद केला आहे की, त्यांची अटक आणि रिमांड दोन्ही बेकायदेशीर आहेत आणि ते ताबडतोब कोठडीतून सोडण्यास पात्र आहेत. त्यांनी रविवारी म्हणजेच 24 मार्च रोजी हंगामी सरन्यायाधीशांकडे तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.
ईडीने गुरुवारी केजरीवाल यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांना अटक केली होती आणि शुक्रवारी त्यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर केले होते. तेथून न्यायालयाने केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे. ईडीने केजरीवाल यांना न्यायालयात हजर करून दहा दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने तपास यंत्रणेला सहा दिवसांची कोठडी दिली आहे.
आता त्यांना 28 मार्च रोजी दुपारी 2 वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, केजरीवाल यांच्या विनंती अर्जावर हायकोर्ट काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे आहे.