मुद्रांक शुल्क माफी योजनेस मुदतवाढ : मदन भोसले यांच्या पाठपुराव्याला यश
कवठे – मुद्रांक शुल्क माफीच्या योजनेस मुदतवाढ मिळाल्याने राज्यभरातील हजारो उद्योजकांना कोट्यवधी रुपयांचा लाभ होणार आहे. या कामी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन गेली अनेक दिवस प्रलंबित असणारा हा प्रश्न यशस्वीपणे मार्गी लावल्याबद्दल उद्योजकांच्या मास संघटनेच्यावतीने माजी आमदार मदन भोसले यांचे आभार मानण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग खात्याने दिलेली मुद्रांक शुल्क माफीची मुदत संपली होती. वास्तविक या योजनेचा लाभ अनेक उद्योजकांना मिळण्यासाठी या योजनेस मुदतवाढ मिळणे गरजेचे होते.
त्यासाठी औद्योगिक महामंडळ व शासन स्तरावर गेली अनेक दिवस पाठपुरावा सुरु होता. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने मास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मदन भोसले यांना या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर मदन भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे वर्षा या निवासस्थानी भेट घेवून उद्योजकांच्या या प्रश्नाचे गांभीर्य पटवून दिले. त्यावर मदन भोसले यांनी मांडलेल्या या प्रश्नाची दखल घेत तातडीने मुदतवाढीचे आदेश दिले.
मुख्यमंत्र्यांनी मदन भोसले यांच्या पाठपुराव्याला दिलेल्या प्रतिसादामुळे मुदतवाढीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्यशासनाने दिलेल्या या आदेशाची प्रत मास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाली आहे. यावेळी मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, माजी अध्यक्ष उतकुर, सहसचिव दिपक पाटील, संचालक संजोग मोहिते, श्रीकांत तोडकर, केतन टंकसाळे, रोहित जगदाळे उपस्थित होते.