नवीन आधारकार्ड काढण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी फक्त मंचर पोस्ट कार्यालय येथे सोय करण्यात आली आहे, परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सरकारने शासकीय योजना आणि इतर कामांसाठी आधारकार्डची सक्ती केली आहे, परंतु आधारकार्ड काढण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवली नाही. आधारकार्ड काढण्यासाठी सात वर्षांपूर्वी गावोगाव महसूल विभागाने कॅम्प घेतले होते. त्यावेळी आधारकार्ड काढण्यासाठी असलेल्या अर्जावर नागरिकांनी व्यवस्थित माहिती भरून दिली. पोस्टाने आलेल्या अनेक आधारकार्डवर माहिती चुकीची आल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक आधारकार्डवर जन्म दिनांक आणि जन्म सालचा उल्लेख नाही. तर काही ठिकाणी गावाचे नावे चुकली आहेत. काही आधारकार्डवर फक्त साल आहे. त्यामुळे सदर आधारकार्ड दुरुस्तीसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
मंचर येथील पोस्ट कार्यालय व स्टेट बॅंकेच्या शाखेत आधारकार्ड दुरुस्तीची सोय आहे, परंतु स्टेट बॅंकेत कालांतराने आधारकार्ड काढण्याचे केंद्र बंद झाले. त्यामुळे सर्व भार मंचर पोस्ट कार्यालयास सांभाळावा लागतो. मंचर येथे तालुक्यातील एकमेव आधारकार्ड केंद्रावर गर्दी होत असल्यामुळे नागरिकांना आधारकार्ड काढण्यासाठी नारायणगाव आणि राजगुरुनगर येथे जात आहेत. त्यामुळे मंचर, पारगाव, घोडेगाव, डिंभा, कळंब, रांजणी, पेठ, लोणी, भीमाशंकर येथील महाईसेवा सुविधा केंद्रात आधारकार्ड काढण्याची सोय करण्याची गरज आहे.