धडपडणाऱ्या लेकराच्या पायांना बळ द्या

आशीर्वाद हॉस्पिटलच्या उद्‌घाटनाप्रसंगी समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे उद्‌गार

वाठार स्टेशन  – धडपडणारं लेकरू आता कुठं उभं राहतंय. या लेकराच्या पायांना बळ द्या. या डॉक्‍टरची काळजी घ्या आणि शुभेच्छाही द्या. मी पण माझ्या काळजातून शुभेच्छा देते, असे उद्‌गार “अनाथांची माय’ व ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी काढले.

येथील डॉ. सुयोग लेंभे यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलचे उद्‌घाटन रविवारी (दि. 25) सायंकाळी सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या पत्नी अध्यक्षस्थाती होत्या. आ. दीपक चव्हाण, जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सुयोग, त्यांच्या पत्नी डॉ. देवयानी, डॉक्‍टरांचे वडील रामभाऊ लेंभे, आजोबांचे सिंधुताईंनी कौतुक केले. रुग्णांची सेवा करा त्यातच परमेश्‍वर आहे, असे त्या म्हणाल्या. डॉ. सुयोग लेंभे यांनी प्रास्ताविक केले. आई, वडील, आजोबा, बंधू रेवण यांनी मोलाची साथ दिल्यामुळे हे शक्‍य झाल्याचे त्यांनी सांगितले.

मान्यवरांनी लेंभे कुटुंबीय व हॉस्पिटलच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लेंभे परिवारातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आजी-माजी पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, डॉक्‍टर, इंजिनिअर, आर्किटेक्‍ट, पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, महावितरणचे अधिकारी, व्यापारी, छत्रपती संभाजी महाराज पतसंस्था, इंग्लिश मीडियम शाळेचे कर्मचारी, महिला उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.