पाचगणी – दुर्गम व डोगराळ प्रदेशातील रस्त्याची गरज लक्षात घेऊन मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या तापोळा- महाबळेश्वर रस्त्याचे रुंदीकरण करत 12 महिन्यांत 90 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तापोळा येथे पार पडले. त्यामुळे हा रस्ता रुंद व सुरक्षित व्हावा, हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार मंकरद पाटील यांची उपस्थिती होती. दुर्गम महाबळेश्वर तालुक्यातील तापोळ्याला येण्याकरीता अरुंद रस्ते पर्यटकांना त्रासदायक होते. मात्र, रस्ता रुंदीकरण करत दोन टप्प्यांत 90 कोटी रुपये खर्चाच्या सात मीटर रुंदीचा रस्त्याचे काम सुरू झाले.
दुतर्फा गर्द झाडी असलेल्या तापोळा- महाबळेश्वर रस्त्यालगतची झाडे न तोडता रस्त्याचे बांधकाम केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक वर्षापासून तापोळा- महाबळेश्वर रस्त्यावरुन येत असतात. मात्र, अती तीव्र वळणे, रुंदीं नसल्याने वाहतूक कोंडीबरोबर वाहनचालकांना होणार त्रास व वेळेचा अपव्यय होत असल्याचे चित्र सदैव पाहायला मिळत होते.
या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने ही माझ्यासाठी आनदांची व समाधानाची बाब असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिपूजनावेळी व्यक्त केली. या रस्त्यामुळे तापोळ्याच्या पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळणार आहे. पूर्वीच्या अरुंद व धोकादायक वळणाच्या रस्त्यामुळे पर्यटक तापोळा रस्त्यावरुन वाहन चालवण्याकरीता नाराज असायचे. मात्र, नवीन रुंदीकरणात सात मीटर रस्त्यामुळे पर्यटकांच्या, वाहनचालकांच्या सुरक्षिततेत वाढ होऊन प्रवास सुखकर व जलद होणार असल्याने तापोळ्याकडे पर्यटकांची वाढ होऊन पर्यटनाला चालना मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.