नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आज सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत. यावेळी त्यांच्यावर सीबीआयने केलेल्या कारवाईच्या विरोधात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज दिल्लीच्या काश्मिरी गेट भागात निदर्शने केली.
आज दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात केजरीवालांची चौकशी होणार असल्याने पोलिसांनी त्या परिसरात तसेच अन्यत्र मोठा बंदोबस्त तैनात केला होता. सीबीआय चौकशीला जाण्यापूर्वी केजरीवालांनी सकाळी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसमवेत एक बैठक घेतली. त्यात दिल्लीचे अनेक मंत्री व नेते उपस्थित होते.
तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पंजाब विधानसभेचे सभापती सरदार कुलतारसिंग हेही यावेळी सहभागी झाले होते. केजरीवालांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मान आणि कलतारसिंग हे आज सकाळीच दिल्लीत दाखल झाले होते ते केजरीवालांबरोबर सीबीआय मुख्यालयातही गेले होते. आज काश्मिरी गेट भागात झालेल्या निदर्शनात दिल्लीचे अनेक नगरसेवकही सहभागी झाले होते.