आजपासून निर्णयाची अंमलबजावणी : चल पादुकांवर होणार महापूजा
आळंदी – अलंकापुरी येथील माउलींच्या संजीवन समाधीवर होणाऱ्या भक्तांच्या महापूजा या शुक्रवार (दि. 27) पासून मुक्ताई मंडपात माउलींच्या चल पादुकांवर होणार असल्याचा एक धाडसी निर्णय देवसंस्थाने घेतला असल्याचे देवसंस्थाचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांनी गुरुवारी (दि. 26) सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
या पत्रकार परिषदेस डॉ.अभय टिळक, अजित कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर उपस्थित होते. गेली अनेक वर्षांपासून माउलींच्या संजीवन समाधीवर भाविकांच्या महापूजा आजतागायत होत आहेत. त्या नियमित पहाटे सहा ते सकाळी साडेअकरा या कालावधीत सुरू असताना माउलींच्या संजीवन समाधीच्या गाभाऱ्यात किमान सहा ते आठ व्यक्ती महापूजेस बसत असल्याने भाविकांना संजीवन समाधीचे सुलभ दर्शन घेता येत नव्हते, तसेच समाधीची सतत झीज होत असल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगितले जात होते.
यामुळे माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेताना रांगेतील भाविकांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते, त्यामुळे देवस्थांकडे याविषयी अनेक तक्रारी आल्याने वरील ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे विकास ढगे पाटील यांनी सांगितले. तर या निर्णयाची परवानगी ही सप्टेंबर महिन्यात जिल्हा न्यायालयाकडून घेतली असल्याचे विश्वस्त डॉ.अभय टिळक यांनी सांगितले. तर चल पादुकांवरील महापुजा दरम्यान दोन महिला कॉन्टेबल, चार पोलीस कर्मचारी व देवस्थांचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.