सरपंच सागर गायकवाड यांची पोलीस निरीक्षकांकडे मागणी
वाघोली- लोणीकंद (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोणीकंद गावातील एका लॉजवर अवैध व्यवसाय सुरू असून हा धंदे बंद करावेत, असे लेखी निवेदन लोणीकंद ग्रामपंचायतचे सरपंच सागर गायकवाड यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे. लोणीकंद येथील ग्रामपंचायतच्या हद्दीमधील एकाने लॉज सुरू केलेले आहे. त्या लॉजमधून अवैध व्यवसाय चालत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य रुपेश गावडे, लॉज परिसरातील काही रहिवाशी यांनी लोणीकंद ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार केलेली होती. त्यांनतर सरपंच गायकवाड यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे निवेदन देत या लॉजची तपासणी करीत पडताळणी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- आंदोलन छेडणार
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व बेकायदेशीर व्यवसाय व अवैध धंदे पोलिसांनी बंद करावेत; अन्यथा माहिती सेवा समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सेवा समितीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी दिला आहे. - लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय सुरू नाही. या लॉजच्या ठिकाणी जाऊन खात्री केलेली आहे. कोणताही अवैध व्यवसाय आढळून आल्यास कारवाई केली जाईल.
– प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन.