सर्व रस्ते लोखंडी बेरीकेड लावून सील
महाळुंगे इंगळे- ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढू नये, या पार्श्वभूमीवर चाकण नगरपरिषदेच्या वतीने चाकण शहरात येणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाकण शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे.
चाकण शहरात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली छोट्या-मोठ्या वाहनांना स्टिकर लावून अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत असतात. संचारबंदी, जमावबंदी व लॉकडाउन असताना गर्दी करतात. अशा प्रकारची गर्दी टाळण्यासाठी चाकण नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व रस्ते लोखंडी बेरीकेड लावून बंद केले आहेत. होम डिलीव्हरी स्विकारण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही चाकण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. नीलम पाटील, नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष ऋषिकेश झगडे यांनी केले आहे.
चाकण शहरातील सर्व रस्ते मंगळवार (दि. 14) पर्यंत सील करण्यात आले आहेत. माणिक चौक, आंबेठाण चौक, जय भारत चौक, तळेगाव चौक, चक्रेश्वर रस्ता, वाघे वस्ती, आंबेडकर नगर आदि ठिकाणी बेरीकेड टाकण्यात आले आहेत. त्यासाठी वरील ठिकाणांसह जागोजागी चाकण नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- चाकण मार्केट बेमुदत काळासाठी बंद
करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे चाकण येथील महात्मा फुले मार्केट बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी येथे पहाटे पासून मोठी गर्दी होत होती. अन्य भागातून व्यापारी व विक्रेते आपला माल घेवून येथे येत असल्याने पुढील धोका टाळण्यासाठी बाजार समितीच्या वतीने पुढील काही काळासाठी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.