आरोग्य कोठ्यांतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
पुणे – महापालिकेच्या “डिजिटल लिटरसी सेंटर’ अंतर्गत आता महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना डिजिटल इंडियाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर धनकवडी आणि सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांच्या पाच आरोग्य कोठ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली. पुणे सिटी कनेक्ट या संस्थेच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून शहरात “सीएसआर’ अंतर्गत पालिकेच्या 100 शाळांमध्ये “डिजिटल लिटरसी सेंटर’ उभारण्यात येणार आहेत. या शिवाय, पालिकेकडून पीएमपी बसमध्येही अशी केंद्र सुरू करण्यात आली असून वस्तीपातळीवर जाऊन या केंद्राच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना मोबाइलवर इंटरनेट वापर, सोशल मीडिया, ऑनलाइन आर्थिक व्यवहार यासंबंधी प्रशिक्षण दिले जाते. हेच प्रशिक्षण आता पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही दिले जाणार आहे. हे कर्मचारी स्मार्ट फोन वापरत असले, तरी अनेक कर्मचाऱ्यांना अद्याप इंटरनेट, ई-मेल, सोशल मीडिया, ऑनलाइन पेमेंट तसेच इतर डिजिटल सुविधा वापरता येत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष आरोग्य कोठीवर जाऊन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी सहकारनगर आणि धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या पाच आरोग्य कोठ्यांची निवड केली आहे.