शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 5 लाख 88 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

23 मे रोजी परीक्षा; अर्ज भरण्यासाठी 10 एप्रिलपर्यंत मुदत

 

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 5 लाख 88 हजार 780 विद्यार्थ्यांची यशस्वी ऑनलाइन नोंदणी झालेली आहे.

दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीमध्ये होते. यंदा करोनामुळे व शाळा बंदच असल्याने परीक्षा लांबणीवर टाकली आहे. 23 मे रोजी परीक्षा घेण्याचे निश्‍चित केले आहे. यासाठी 9 मार्च रोजी अधिसूचना जाहीर केली होती. आधी 21 मार्चपर्यंत शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी मुदत होती.

त्यानंतर 30 मार्चपर्यंत ती वाढविण्यात आली. आता पुन्हा 10 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आतापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 46 हजार 869 शाळांनी नोंदणी केली आहे. इयत्ता पाचवीसाठी 3 लाख 63 हजार 968 विद्यार्थ्यांचे अर्जासह शुल्कही जमा झाले आहे. शुल्क न भरल्यामुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे.

21 हजार 62 विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. इयत्ता आठवीसाठी 2 लाख 25 हजार 82 विद्यार्थ्यांची यशस्वी नोंदणी झाली. 15 हजार 664 विद्यार्थ्यांची नोंदणी अद्याप अपूर्ण आहे. खुल्या प्रवर्गातून सर्वाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यात पाचवीसाठी 1 लाख 36 हजार 969, तर आठवीसाठी 85 हजार 574 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.