पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांची प्रमाणपत्रे उमेदवारांना ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पहिल्यादा टायपिंग व लघुलेखन परीक्षेसाठीची प्रमाणपत्रे उमेदवारांना लवकरच ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे प्रमाणपत्रांच्या बोगसगिरीला आळा बसणार आहे.
परीक्षा परीषदेमार्फत इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा, संगणक व मॅन्युअल टायपिंग, टीईटी, अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी, एनटीएस, एनएमएमएस, डी.एड. यांसह अन्य विभागीय सेवा प्रवेशोत्तर परीक्षा घेण्यात येतात. काही महिन्यांपूर्वी टीईटी व टायपिंगच्या परीक्षांची बोगस प्रमाणपत्रे आढळली होती. दरम्यान शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या अनेकदा बैठका घेऊन कामकाजात पारदर्शकता आणण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार परीक्षा परिषदेने कामकाजात सुधारणा करण्याला प्राधान्य दिले आहे.
दरम्यान, शुक्रवारी मांढरे यांनी पुन्हा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे, प्रभारी आयुक्त शैलजा दराडे, उपायुक्त संजय राठोड, सहाय्यक आयुक्त स्मिता गौड, संगीता घोडेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या मेलवर प्रमाणपत्र
पुढील परीक्षेच्या वेळी संबंधित विद्यार्थ्यांचा ई-मेल, मोबाइल नंबर व आधार क्रमांक घेण्यात येईल आणि संबंधित उमेदवारांच्याच ई-मेल आयडीवर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे डॉ. बेडसे यांनी सांगितले.
पडताळणीही ऑनलाइन
- निकालानंतर 15 दिवसांत ऑनलाइन प्रमाणपत्र मिळणार
- प्रमाणपत्र छपाई व वाहतूक खर्चाची बचत होणार
- गैरप्रकारांना आळा बसणार
- प्रमाणपत्रांची पडताळणीही ऑनलाइनच होणार
- उमेदवारांना संकेतस्थळावरून सहजासहजी प्रमाणपत्र मिळणार