Pune Lockdown Breaking | पुणे शहरासाठी नवीन नियमावली जाहीर; जाणून घ्या काय सुरु, काय बंद ?

पुणे – शहरातील वाढती करोना बाधितांची रुग्णसंख्या लक्षात घेऊन अत्यावश्‍यक सेवा वगळता शहरात सर्व खासगी अस्थापना, दुकाने, मॉल, मार्केट हॉटेल दि. 30 एप्रिल बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्यशासनाच्या आदेशानंतर महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी सोमवारी रात्री याबाबत आदेश काढले असून त्याची अंमलबजावणी आजपासूनच होणार आहे.

त्यामुळे एका बाजूला शहरात लॉकडाऊन नको, अशी मागणी व्यापारी तसेच सर्वसामान्यांकडून होत असतानाच शासनाच्या आदेशाच्या धर्तीवर महापालिकेने काढलेल्या या आदेशामुळे शहर जवळपास लॉकडाऊनच असणार आहे.

या शिवाय, शनिवारी आणि रविवारी ही पूर्ण लॉकडाऊन असणार असून नागरिकांना बाहेर पडण्यास पूर्णत: बंदी असणार असल्याचे आयुक्‍तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांच्या सोईसाठी किराणामाल, भाजीपाला, डेअरी, मिठाई व खाद्यपदार्थांची दुकाने या कालावधीत सुरू राहणार आहेत.

राज्यशासनाने रविवारी राज्यात कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, हे निर्बंध पुण्यासाठी असणार नसल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जाहीर केले होते तर महापालिकेनेही पुणे शहरासाठी दि. 8 एप्रिल पर्यंतचे निर्बंध काढले असून तेच लागू राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, सोमवारी शहरातील करोना स्थितीबाबत वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीनंतर शासनाच्या आदेशाचीच अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, शासनाच्या आदेशातील सार्वजनिक वाहतूक 50 टक्के क्षमतेने चालविण्याचे स्पष्ट केले असले तरी महापालिकेने मात्र, दि. 8 एप्रिल पर्यंत पीएमपी सेवा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रिक्षा, कॅब तसेच इतर प्रवासी वाहनांसह, उत्पादक कंपन्या तसेच या लॉकडाऊनच्या कालावधीत परवानगी देण्यात आलेल्या अस्थापनांना येत्या 10 एप्रिल पासून नवीन नियमावली असून त्यात, कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेणे अथवा त्यांचा करोना अहवाल निगिटीव्ह असल्याचा 15 दिवसांचा वैधता अहवाल जवळ बाळगणे बंधनकारक असणार आहे. त्यात, हॉटेल व्यावसायिक, वृत्तपत्रांचे वितरक, बॅंकाचे कर्मचारी, हॉटेलचे कर्मचारी, बांधकाम कामगार, उत्पादक कंपन्या, मंगल कार्यालये, दहावी बारावीच्या शाळांचे शिक्षक, खासगी वाहनांचे चालक, वाहक यांचा समावेश असणार आहे.

तर सर्व अत्यावश्‍यक सेवांची सर्व प्रकारची वाहने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सहा या वेळेत सुरू राहणार असून शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवारी सकाळी सात पर्यंत ती पुर्णत: बंद राहणार असल्याचे आयुक्तांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

तर वैद्यकीय सेवा देणाऱ्या अस्थापना 100 टक्के उपस्थितीत सुरू राहणार असून शासकीय कार्यालयात 50 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तर हॉटेल, बार, रेस्टॉरंट आणि बार पुर्णपणे बंद करतानाच त्या ठिकाणी केवळ ऑनलाईन पार्सल सेवा देण्यास मुभा देण्यात आली आहे. तर या आदेशात लग्न कार्य आणि अंत्यविधीस मुभा देण्यात आली असून त्यासाठी उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे.

ही कार्यालये राहतील सुरू
– सर्व प्रकारच्या बॅंका
– शेअर बाजार
-महावितरणची कार्यालये
– दूर संचार सेवा पुरवठादार
-विमा- मेडीकल कंपनी
– औषध उत्पादन, वितरण सर्व अस्थापना
– आयटी व आयटीईएस कंपनी ( सर्वर व अत्यावश्‍यक काम)
– वकील, सीए व वित्तीय कार्यालये
– अत्यावश्‍यक वस्तूची दुकाने
– वर्तमानपत्र छपाई व वितरण

– उत्पादन क्षेत्र

हे राहणार पूर्ण बंद
– सर्व प्रकारची दुकाने, मॉल
– नाटयगृहे, चित्रपट गृहे, सांस्कृतीक सभागृहे
– रिक्षा, कॅब, प्रवासी वाहने
– हॉटेल रेस्टॉरंट, बार फूड कोर्ट
– सर्व धार्मिक स्थळे
– स्पा, सलून, ब्युटी पार्लर
– सर्व शाळा, महाविद्यालये

-सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.