कराड – गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत जमिनीच्या वादातून दोन गटात चाकू व कोयत्याने तुंबळ हाणामारी झाली. मंगळवार, दि. 2 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये माजी पंचायत समिती सदस्याच्या भावासह दोन्हीकडील तीन जण जखमी झाले आहेत. मतीन मुतवल्ली, मुकुंद पाटील, नयन पाटील अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे- बेंगळुरू महामार्गानजीक गोटे गावच्या हद्दीतील बांबूचा माळ
नावाच्या शेतशिवारात मुतवल्ली कुटुंब काम करत असताना त्याठिकाणी मुकुंद पाटील, नयन पाटील व अन्य एकाने येवून या जमिनीचा वाद सुरू आहे, तुम्ही येथे काम करू नका, असे सांगितले. त्यातून दोन्ही कुटुंबामध्ये वाद सुरु होऊन त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. यामध्ये चाकू व कोयत्याने एकमेकांवर वार करण्यात आले.
यामध्ये मतीन मुतवल्ली याच्या डोक्याला आणि मुकुंद पाटील याच्या पोटाला गंभीर इजा झाली असून नयन पाटीलही गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर कराड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्याचे काम सुरू होते.