सातारा – सातारा पालिकेच्या हद्दवाढीतील नवीन भागासाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर या प्रयत्नांना यश आले असून गेल्या महिन्यात 58 कोटी रुपयांच्या प्रशासकीय इमारतीस मंजूरी मिळून पैकी 10 कोटीचा पहिला हप्ता प्राप्त झाला आणि आज 48 कोटींच्या हद्दवाढ भागातील कामांना मंजुरी प्राप्त झाली आहे, यापैकी 25 कोटीचा पहिला हप्ता नगर विकास विभागाने काल दि. 8 एप्रिलच्या शासन निर्णयाने सातारा नगरपालिकेकडे वर्ग केला आहे, अशी माहिती सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
सातारा नगरपालिकेच्या हद्वाढीत समाविष्ट नवीन भागातील विविध कामांसाठी पालिकेने सुमारे 51 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला होता. शासनाकडून 48 कोटींच्या प्रस्तावास मंजुरी मिळालेली आहे, अशी माहिती यापूर्वी त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली होती. उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे की, शाहुपूरी, शाहूनगर, विलासपूर, खेड हा भाग हद्दीत समाविष्ट झाला.
या भागातील कामे पूर्ण करण्यासाठी 25 कोटीचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. हद्दवाढ भागातील रस्ते, गटारे, पथदीपांसाठी तसेच मोकळ्या जागांचा विकास आणि वृक्षारोपण करण्यासाठी एकूण 48 कोटीच्या प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे. लवकरच कामांना सुरुवात करण्यात येणार आहे, असेही खासदार भोसले यांनी नमूद केले आहे. दरम्यान, शाहुनगरच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून सादर केलेल्या प्रस्तावास सुमारे 28 कोटींचा निधी लवकरच मंजूर होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.