पुणे –पुणे महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या मुंबई -बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर 9 ठिकाणी कचरा डेपो तयार झाले आहेत. मुख्य महामार्गालगत तसेच महार्मागाच्या सेवा रस्त्यावर हे डेपो तयार झाले असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याने महापालिकेने तातडीने या ठिकाणचा कचरा हटविण्यात यावा, असे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महापालिकेस दिले आहे. महामार्गालगतच्या गावांचा हा कचरा असून हा रातोरात टाकला जात असल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचे महापालिकेकडून या पत्राबाबत माहिती देताना सांगण्यात आले.
हा महामार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीतून बालेवाडीपासून नऱ्हेपर्यंत जातो. या रस्त्यात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या पूर्वीही महामार्ग प्राधिकरणाकडून महापालिकेस अशा ठिकाणांची यादी दिली होती. मात्र, नेमकी ठिकाणे कळविण्यात यावे असे प्राधिकरणास कळविले होते. त्यानुसार, प्राधिकरणाकडून नुकतेच कचरा टाकण्यात येणाऱ्या जागांचे सर्वेक्षण करून त्यांची यादीच महापालिकेस पाठवली आहे. त्यानुसार, तातडीने हा कचरा उलचून घ्यावा, असे आदेश पालिकेच्या घनकचरा विभागाने संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना दिले.
या ठिकाणी टाकला जातोय कचरा
*नऱ्हे स्मशानभूमीजवळ
*भूमकर चौक नऱ्हे सेवारस्ता
*नवले पूल सेवारस्ता दोन्ही बाजू
*मुठा नदीकाठ वारजे
*वेदभवन, चांदणी चौक
*एचईएमआरएल सर्व्हिस रस्ता
*सुतारवाडी सेवारस्ता दोन्ही बाजू
*सुस, पाषाण पुलाजवळ