पिंपरी – स्वच्छ कारभाराच्या आश्वासनावर महापालिकेत सत्ताधीश झालेल्या भारतीय जनता पक्षाने कोट्यधीश होण्यासाठी भ्रष्ट आणि गैरमार्ग अवलंबल्याचे बुधवारी झालेल्या कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे पक्ष तर अडचणीत आलाच असून या पक्षाची इभ्रतही अक्षरश: वेशीला टांगल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
गुरुवारी (दि. 19) भाजपाच्या शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यासह आमदार लक्ष्मण जगताप यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत आरोपाचे ढग दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची देहबोली आणि चेहरेच भारतीय जनता पक्ष अडचणीत आल्याचे सांगून गेली. नेहमीचा उत्साह, आरोपांना उत्तर देण्याची शैली आणि आत्मविश्वास सर्वच ढासळल्याचे दिसून आले. दोन्ही आमदारांनी या कारवाईपासून पक्षाला दूर ठेवण्याचा अथवा पक्षाची प्रतिमा सावरण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यताही धूसर बनली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करत तसेच पालिकेत सत्ता आल्यास स्वच्छ, पारदर्शी कारभार करण्याचे आश्वासन देत भाजपाने सन 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महापालिकेची सत्ता काबिज केली होती. यानंतर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतरही विरोधकांना पुरावे न मिळाल्याने भाजपाने स्वच्छ कारभाराचा बागुलबुवा सुरूच ठेवला होता. मात्र, बुधवारी (दि. 18) रोजी झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने भाजपाचा चेहरा तर उघडा पाडलाच मात्र विरोधकांनाही आयते कोलीत दिले.